FASTag सोबत चालाखी करणाऱ्यांची खैर नाही; NHAI थेट ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने शुक्रवारी जाहीर केले की, वाहनांच्या विंडस्क्रीनवर फास्टॅग योग्य प्रकारे न लावणाऱ्या चालकांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची प्रक्रिया अधिक मजबूत करण्यात आली आहे. फास्टॅग अयोग्य प्रकारे लावण्यामुळे म्हणजेच ‘लूज फास्टॅग’मुळे टोल संचालनात अडचणी येत असल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे ‘लूज फास्टॅग’?

‘लूज फास्टॅग’ म्हणजे असा फास्टॅग जो गाडीच्या विंडस्क्रीनवर योग्य प्रकारे चिकटवलेला नसतो, तर तो चालकाकडे हातात असतो किंवा अशा ठिकाणी ठेवलेला असतो जिथून तो सहज स्कॅन होऊ शकत नाही.

NHAI ने धोरण केले सुव्यवस्थित

NHAI च्या निवेदनानुसार, आगामी मल्टी-लेन फ्री फ्लो (MLFF) टोलिंग आणि एन्युअल पास सिस्टीमसारख्या उपक्रमांचा विचार करून फास्टॅगची प्रामाणिकता आणि प्रणालीची विश्वासार्हता सुनिश्चित करणे गरजेचे आहे. त्यामुळे ‘लूज फास्टॅग’च्या समस्येवर तोडगा काढणे अत्यंत आवश्यक आहे. टोल संकलन एजन्सी आणि वापरकर्त्यांसाठी अशा फास्टॅगची माहिती तात्काळ देण्याची आणि त्या आधारे ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची प्रक्रिया अधिक सुसज्ज करण्यात आली आहे.

लूज फास्टॅगमुळे होणाऱ्या अडचणी

अयोग्यरीत्या लावलेले फास्टॅग टोल प्लाझावर अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण करतात — जसे की लेनमध्ये गर्दी, चुकीचे चार्जबॅक, इलेक्ट्रॉनिक टोल प्रणालीतील अडथळे, टोलवर उशीर आणि इतर प्रवाशांना होणारी गैरसोय.

टोल एजन्सींना NHAI चे निर्देश

प्राधिकरणाने यासंबंधी माहिती देण्यासाठी स्वतंत्र ईमेल आयडी उपलब्ध करून दिला आहे आणि टोल संकलन एजन्सी आणि वाहनचालकांना अशा फास्टॅगची माहिती तात्काळ द्यावी, असे निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित फास्टॅग त्वरित ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येतील.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News