सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरचे शिर्डीत होणार संमेलन; साई संस्थानच्या कार्याचा प्रसार करण्याचा हेतू

"सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व यूट्यूबर संमेलन" श्री साईबाबा संस्थानच्या वतीने व शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे.

श्री साईबाबांच्या जीवनकार्याचा तसेच श्री साईबाबा संस्थानमार्फत सुरू असलेल्या विविध सेवाकार्यांचा प्रचार आणि प्रसार डिजिटल माध्यमांतून अधिक प्रभावी व्हावा, या हेतूने लवकरच “सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व यूट्यूबर संमेलन” श्री साईबाबा संस्थानच्या वतीने व शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत असून, यासाठी इच्छुक व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली.

शिर्डी संस्थानच्या कार्याच्या प्रसाराचा उद्देश

या उपक्रमाबाबत माहिती देताना श्री गाडिलकर म्हणाले की, “अलीकडील काळात सोशल मीडिया हे प्रभावी संवादाचे आणि प्रसाराचे महत्त्वाचे माध्यम ठरले आहे. शिर्डी संस्थानच्या सेवा कार्याचा व्यापक प्रचार व्हावा, या दृष्टिकोनातून शिर्डी ग्रामस्थांनी  विशेष डिजिटल संमेलन आयोजित करण्याची मागणी केली होती. सदर प्रस्तावाला माननीय तदर्थ समितीची मान्यता मिळालेली असून, त्यानुसार हे संमेलन लवकरच पार पडणार आहे.” या संमेलनात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ०८ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज सादर करावा. अर्ज  संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर www.sai.org.in तसेच जनसंपर्क विभागामध्ये उपलब्ध आहे.

संमेलनात सहभागी होण्याची पात्रता काय?

  • अर्जदार हा सोशल मीडियावर सक्रिय असावा (YouTube, Instagram, Facebook, इ.) किमान ५०,००० फॉलोअर्स / सबस्क्राइबर्स असणे आवश्यक.
  • आध्यात्मिक, समाजोपयोगी, प्रेरणादायी आशयावर आधारित व्हिडिओ तयार करण्याचा अनुभव असावा.
  • यापूर्वी कोणतीही वादग्रस्त  पोस्ट केलेली नसावी
  • संमेलनासाठी पात्र अर्जांची तपासणी करून निवड झालेल्या इन्फ्लुएंसर्सना संमेलनाचे ठिकाण, तारीख आणि वेळ संस्थानमार्फत स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे.
  • निवड झालेल्या व्यक्तींकरिता संस्थानमार्फत भक्तनिवासात निवास, तसेच प्रसादालयात भोजन व्यवस्था मोफत करण्यात येणार आहे.

शिर्डी संस्थानच्या या नावीन्यपूर्ण डिजिटल उपक्रमात सहभागी होण्यासाठी YouTubers, Instagram Reel Creators, Facebook Video Creators, तसेच अन्य प्रभावशाली डिजिटल कंटेंट निर्मात्यांनी आपला अर्ज ०८ ऑगस्ट पूर्वी सादर करावा, असे आवाहन संस्थान व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News